मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 16 डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता थेट नागपूरलाच महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. या मंत्रिपदाची संभाव्य नावे समोर आली आहेत. मात्र, ऐनवेळी या नावांवर शिक्कामोर्तब होऊन अधिकृतपणे ती जाहीर केली जाऊ शकतात. त्यामध्ये, काहीसे बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरला होणार असल्याचे समजते.