मुंबई: आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते.
मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने आज सकाळी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म १९५१ मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय, १९९९ मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते.