दोनवडे – गेल्या काही दिवसापासून कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना काय दर देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. आज कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी याला पूर्णविराम देत ऊस दराची घोषणा केली. चालू गळीत हंगाम करिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रूपये प्रमाणे पहिला अँडव्हान्स जाहीर केला.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार नरके म्हणाले की, सन २०२४-२५ या चालू हंगामात दिनांक २३ डिसेंबर अखेर १,३०,०५० मे.टन उसाचे गळीत करुन १,४२,८२० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. यात सरासरी साखर उतारा ११.२२ टक्के इतका आहे. कारखान्याचे डिस्टीलरी आणि कोजन प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत.या हंगामात सात लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. सर्व सभासद, बिगर सभासद यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती आमदार नरके यांनी यावेळी केली. कारखान्याचे उपाध्यक्ष राहूल खाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते.