प्रयाग चिखली वार्ताहर:
प्रयाग चिखली परिसरातील शेतीपंपाच्या इलेक्ट्रिक केबल चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना केबल चोरीची धास्ती वाटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. केबल चोरीबाबत पोलीस ऍक्शन मोडवर कधी येणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
प्रयाग चिखली वरणगे पाडळी आंबेवाडी परिसरात गेल्या तीन चार महिन्यांपासून केबल चोरांनी केबल चोरीचा सपाटा लावलेला आहे. गेल्या दोन दिवसात प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदीकाठी असलेल्या सुमारे 25 पंपांच्या केबल्स चोरांनी चोरून नेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
त्याचबरोबर वरणगे पाडळी आंबेवाडी येथीलही केबल चोरीचे प्रमाण गेल्या दोन तीन महिन्यापासून चांगलेच वाढले आहे. याबाबत पोलिसात तक्रार देऊन देखील चोर सापडत नाहीत शिवाय चोऱ्या थांबत नाहीत त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. प्रयाग चिखली आंबेवाडी वरणगे पाडळी या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे शेती पाण्याचे पंप पंचगंगा नदी काठावर आहेत या पंपांना कॉपरची केबल असते केबल चोरटे ही केबल पंपापासून कापून चोरी करून घेऊन जातात व त्यातील कॉपर तांबे काढून विकतात ही चोरी करणे चोरट्यांना सोपे जाते शिवाय हा कारभार रात्रीचा असल्यामुळे चोरटेही सापडत नाहीत.
एका पंपासाठी साधारण चार-पाच हजारापासून 8-10 हजारापर्यंत किमतीची केबल वापरलेली असते. याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी देऊन देखील केबल चोर सापडत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. पोलिसांनी याबाबत तपास मोहीम राबवून केबल चोरीच्या प्रकरणाला तसेच पंपाच्या प्लेट्स चोरीच्या प्रकरणांना आळा घालावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे