कोल्हापूर: 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाचा निरोप व एक जानेवारी नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र नागरिक एकत्र येतात अशा परिस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर इचलकरंजी शहर परिसरासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे.
सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त करता 1 पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक सहा उपविभागीय पोलीस अधिकारी 80 पोलीस अधिकारी 700 पोलीस कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
तसेच स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक निरीक्षण यांच्या माध्यमातून 50 ठिकाणी नाकाबंदी व ब्रेथ अनालायझर ची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
पोलीस अभिलेखांवरील फरारी गुंड तडीपार यांची देखील कसून चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाईची नियोजन करण्यात आले आहे.
सदर उत्सवाकरिता एकत्रित येणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी गणवेशातील महिला व पुरुष अधिकारी/अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथकाची ही नेमणूक करण्यात आली आहे.
उत्सवा दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेत करण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.