दोनवडे: सन 1997 ते 2003 दरम्यान विद्यामंदिर खुपीरे या शाळेत संस्कारांचे धडे गिरविलेल्या 45 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या वर्गमित्र-मैत्रिणी व गुरुजनांना एकत्र आणत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. यातील बहुतांश शिक्षक-शिक्षिका आता सेवानिवृत्त असून काही वयोवृद्ध आहेत.
शेती,उद्योग, नोकरी आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करत पुनःश्च एकदा आपल्या आवडत्या शिक्षक-शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात आनंदराव बेडेकर(सर) यांनी प्रार्थनेने करून सर्वांना पुन्हा एकदा शाळेची सैर घडवली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित माजी मुख्याध्यापिका सौ. गिरी मॅडम, अध्यापिका छाया पाटील मॅडम ,काटे मॅडम, पेडणेकर मॅडम, कुलकर्णी मॅडम, तोडकर मॅडम, सोनवडेकर मॅडम,साळोखे मॅडम, वाझे मॅडम,गायकवाड सर, खाडे सर यांनी हितगुज साधताना विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यामंदिर खुपीरे शाळेत कार्यरत असताना आलेले अनुभव, गमती-जमती सांगत आपल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील रम्य आठवणींना उजाळा दिला. वैवाहिक जीवनातून वेळ काढत माजी विद्यार्थीनींदेखील कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांच्या साथीने मनोरंजक खेळ खेळले. कार्यक्रमाअंती स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत जयश्री हुजरे, गोपीका आडणाईक यांनी केले, तर समालोचन अरुण पाटील यांनी केले. या स्नेहमेळाव्यचे नियोजन सुनिल पाटील, सचिन पाटील यांनी केले.
इंद्रजित पाटील यांनी आभार मानले केले तसेच संपर्कात राहण्याची सदिच्छा व्यक्त केली