सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली. भाजपा आमदार सुरेश धस यांनीही आजची सभा गाजवली. धनंजय मुंडेंसह त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. एकीकडे वेगवेगळ्या यंत्रणा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे अजूनही या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे सुरू आहेत. आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचे मुलही उपस्थित होते. 

सुरेश धस यांनी या सभेमध्ये आकांचे आका म्हणत पुन्हा परळीतील नेत्यावर निशाणा साधला. तर यापुढे जाऊन सुरेश धस यांनी अजित पवार यांनाही सवाल केला. अजित पवार क्या हुओ तेरा वादा… अजितदादा कायको इसको अंदर लिया? ये अंदर लेनेजैसा नहीं है… संदीप दिघुळेपासून ते संतोष देशमुखपर्यंत हत्येची बेरीज  करा, अजितदादा जरा हिशोब करा… या हत्या कुणी घडवून आणल्या, यामागचा मास्टरमाईंड कोण? हे जर माहिती नसेल तर बारामतीचे माणसं परळीत पाठवा. तिथे आमच्या समाजाला, अठरापगड जातींना काय वागणूक मिळतेय बघा. 200 कुटुंब घर सोडून चालले असं म्हणत सुरेश धस यांनी तुफान हल्लाबोल केला.