चिखली :
नव्याने सुरू असलेल्या नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर पन्हाळा तालुक्यातील कुशिरे – निगवे दरम्यान उड्डाण पूल बांधावे या मागणीसाठी आज सकाळपासून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, जोतिबा डोंगर हे धार्मिक दृष्ट्या मोठे महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून जोतिबा देवाच्या दर्शनासाठी प्रत्येक रविवार, पौर्णिमा आणि चैत्र यात्रा काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होणार असलेने राष्ट्रीय महामार्गावरील पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील छेद रस्त्यावर उड्डाण पूल बांधण्यात यावा अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी जोर धरला होता.गेली ७ महिने मागणी करून, स्थानिक आमदार, खासदार यांच्यासह प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने कुशिरे येथील छेद रस्त्याच्या ठिकाणी आज सकाळपासून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भागातील सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने मागण्यांचे निवेदन पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आले.यावेळी तहसीलदार माधवी शिंदे म्हणाल्या, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी या मागणी बाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेतला आहे आणि आपली मागणी योग्य असल्याचे तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं.
नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर पन्हाळा तालुक्यातील कुशिरे – निगवे दरम्यान उड्डाण पूल लवकरात लवकर व्हावे आमच्या मागणीचा विचार केला नाही तर पुढील आंदोलन अधिक तिव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा येथील ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आला.
ठिय्या आंदोलन सुरू असताना महामार्ग प्राधिकरण चे कोल्हापूर विभागाचे प्रकल्प संचालकांचे लेखी आश्वासन आणि आंदोलकांशी फोन वरून आश्वासक चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन दुपार नंतर स्थगित करण्यात आले. कृतिसमितीच्या मागणीचा विचार करून या प्रकल्पाच्या रचनेमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येतील अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या पत्रातून दिलेली आहे. तसेच या बाबत मंगळवारी बैठकही आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले,आंदोलनामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः भागातील महिलांची संख्या लक्षणीय होती.या आंदोलनामध्ये कुशिरे, पोहाळे, जाखले, केखले, पोखले, गिरोली, निगवे दुमाला, जोतिबा डोंगर , वडणगे या गावातील नागरिकांनी सहभाग घेतला.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसूर्लेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव डॉ. स्वाती पाटील, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा तालुका माजी सभापती अनिल कंदुरकर, पृथ्वीराज सरनोबत, शिव सेना (उबाठा) तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पोहाळे येथील इंद्रायणी चौगले यांनी मनोगत व्यक्त करून या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलन स्थळी शाहूवाडी विभागांतर्गत पन्हाळा, गगनबावडा, कोडोली, शाहूवाडी,कळे पोलीस स्टेशन मार्फत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलन यशस्वी होण्यासाठी दादासो तावडे, सुरेश बेनाडे, कूशिरेचे सरपंच बाबासाहेब माने, उपसरपंच विष्णू कळके, पोहाळेच्या सरपंच सुरेखा मोरे, गिरोलीच्या सरपंच छाया गुरव यांनी परिश्रम घेतले.