मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्येतील जवळपास सर्वच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर, एक आरोपी अजूनही फरार आहे. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यामुळे अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे देखील अडचणीत आले आहे. कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस असल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अशात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही रोष व्यक्त केला जातोय. आता तर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. आज (7 जानेवारी)लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यामुळे लातूर-परभणी मार्गावर वाहतूक खोळंबली होती.
याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक दिसून आला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यावेळी मोर्चेकऱ्यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, अशा घोषणा केल्या. तसेच इतरही काही मागण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.
लातूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती संभाजी राजे चौक, रेनापुर शहरातील रेनापुर नाका, बोरगाव काळे, लातूर नांदेड रस्त्यावरील चाकूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा असून त्यातच पंकजा मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याने मुंडे भाऊ-बहीण दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे