राधानगरी : राधानगरी तालुक्याच्या उत्तर भागामध्ये व जंगलमय धनगरवाडा परिसरामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने या भागातील धनगर बांधव धास्तावले आहेत. वनविभागाने तात्काळ दखल घेत या बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
या भागातील विविध धनगरवाड्यावर बिबटयाचा वावर आढळत आहे. यामध्ये फाले, रातांबीचा वाड्यावर बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आढळुन आला आहे. यामध्ये मागील आठवड्यामध्ये रातांबीच्या वाड्यावर 11 कुत्री आणि 8 शेळ्यांचा फडश्या पाडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विकास मलगुंडे यांनी दिली आहे. दिनांक 10 रोजी रात्री कोनोली पैकी फाले धनगरवाडा ह्या गावातील बाबू जानु फाले ह्या अत्यंत गरीब शेतकऱ्याच्या घर शेड मध्ये घुसून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला.
पालक आणि विध्यार्थी दहशतीत
वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांत प्रचंड भीती पसरली असून, भागातील अनेक वाड्यावर बिबट्याची भीती पसरली आहे. विशेषत: वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून नित्याची कामे करणे भाग पडत आहे. या
परिसरातील विद्यार्थी व नागरिक शाळेला तसेच मुख्य गावाला ये-जा करत असतात. या सर्वांवर बिबट्याची भीती व दहशत बसली आहे. रोजच आज येथे तर उद्या तिथे बिबट्यासदृश्य प्राणी दिसला, अशा बातम्या येत असल्याने पालकवर्गही चिंतेत सापडला आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे धाडस करताना दिसत नाहीत.या घटनेमुळे वने आणि वन्यजीव अधिवासांजवळील भागात विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
बेसुमार वृक्षतोड आणि परिसरात बिबट्याचे वाढते दर्शन
या भागात चोरट्याकडून बेसुमार वृक्षतोड आणि नैसर्गिक अधिवासांवर अतिक्रमण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास मलगुंडे यांनी सांगितले. बिबट्या अन्नाच्या शोधात, लोकवस्तीच्या भागात अनेकदा भटकतात, ज्यामुळे मानवी सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.