कोल्हापूर: किर्लोस्कर वसुंधरा उद्योग समूह, दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग, सायबर महाविद्यालया व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक व पर्यावरण संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा सायबर कॉलेज कोल्हापूर येथे घेण्यात आली. यावेळी बोलताना गोवा येथील फीडबॅक फाउंडेशन या कचरा व्यवस्थापन संस्थेचे उपाध्यक्ष बालाजी केंद्रे यांनी पर्यावरण संवर्धन ही युवकांची जबाबदारी असे उद्गार काढले.
पर्यावरण संवर्धन ही खूप व्यापक संकल्पना असून दिवसागणिक सर्व स्तरावर याचा ऱ्हास होताना दिसून येते आहे हे चित्र बदलायची ताकद युवकांमध्ये असून अतिशय छोट्या छोट्या पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी करून कचऱ्याचे सुमारे 200 हून अधिक प्रकार असून प्रत्येक व्यक्तीने ओला व सुका कचरा हा वर्गीकरण करून संबंधित संस्थेकडे दिल्यास कचऱ्यापासून विविध गोष्टींच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी किलोस्कर उद्योग समूहाचे मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक, श्री,हरीष सैवे यांनी युवकांनी पर्यावरणप्रति ठराविक उद्देश ठेऊन काम करणे क्रम प्राप्त असून येणाऱ्या काळात पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असणार आहे.
कार्यशाळेच्या समारोप सत्राप्रसंगी बोलताना बेळगाव येथील माजी प्राचार्य, पर्यावरण तज्ञ,डॉ. डी. एन. मिसाळे यांनी पर्यावरण रक्षणा साठीचे धोरण या विषयावर बोलताना विविध शासकीय, अशासकीय संस्था सामूहिक रित्या पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम सातत्यपूर्ण राबवणे गरजेचे असून कृतीशील उपक्रमावर भर देणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले.
कार्यशाळेची सुरुवात झाडाच्या रोपाला पाणी घालून व विकास अवघडे यांच्या देशभक्तीपर गीताने करण्यात आली. कार्यशाळेचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन किर्लोस्कर कंपनीचे सीएसआर डेप्युटी मॅनेजर श्री शरद अजगेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. सोनिया राजपूत डॉ. टी व्ही जी सरमा, लक्ष्मी फाउंडेशन चे अध्यक्ष विनायक देसाई यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यशाळेत सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुरेश आपटे प्रा. महेंद्र जनवाडे,श्री. मोहन तायडे,कल्याणी सातपुते भाग्यश्री स्वामी, उत्कर्ष जमदाडे, अर्पिता सुरडकर, अमिषा शिंदे, प्रसाद खवरे,संकेत पिसे यांचे सहकार्य लाभले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन मोनिका भोसले यांनी केले.