मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीने २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. त्यामुळेचं नाना पटोले यांचा राजीनामा हाय कमांडने स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस हायकमांडकडून सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरु आहे. अमित देशमुख आणि सतेज पाटील अशा दोन नावांची चर्चा असली तरी सतेज पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल येत्या सोमवारपर्यत अधिकृत घोषणा होऊ शकते, असे बोललं जात आहे.