नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्याघ्र प्रेमींसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. 2025 सुरुवातीलाच विदर्भात वाघांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून विदर्भात 22 दिवसांत एकूण 11 वाघांचा मृत्यू झाला आहे. या 11 मृत्यूंपैकी दोन वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका वाघाची शिकार करण्यात आली, तर भंडारा जिल्ह्यात शिकारीमुळे दुसऱ्या वाघाचा मृत्यू झाला. या दोन घटनांपैकी एका प्रकरणात वाघाचे तीन तुकडे करण्यात आले होते, तर दुसऱ्या प्रकरणात वाघाचे नख आणि दात काढलेलं आढळलं.
एका ठिकाणी 5 ते 6 महिन्यांच्या दोन वाघांच्या पिल्लांचे मृतदेह सापडले. दोन वाघांचा मृत्यू परस्परांच्या मारामारीत झालेल्या जखमांमुळे झाला असल्याचंही समोर आलं आहे. त्याचवेळी, इतर मृत्यू देखील संशयास्पद मानले जात आहेत. राज्यात वाघांच्या शिकारीचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. 2025 हे वर्ष वाघांच्या मृत्यूनं सुरू झालं आहे. अवघ्या 22 दिवसांत 11 वाघांचे मृत्यू होणं हे अतिशय गंभीर आणि चिंताजनक मानलं जातंय.
मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीचे शिकारी महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच आणि मेळघाट सारख्या भागात वाघांची शिकार करत आहेत. दोन वर्षांपूर्वी, बावरिया नावाच्या वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीनेही महाराष्ट्रात वाघांची शिकार केली होती. या वर्षी झालेल्या 11 मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांबाहेर झाले आहेत. या संपूर्ण विषयावर आज तकने वन विभागाचे अधिकारी गिरीश वशिष्ठ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की जानेवारी महिन्यात 11 वाघांचा मृत्यू झाला.