राधानगरी -तालुका स्तरावर कार्यशाळेच्या स्वरूपात शिक्षण परिषद होते. ‘ज्ञानरचनावादावर’ आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्या धर्तीवर कार्यशाळा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ही परिषद उपयुक्त ठरते. असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ कांबळे यांनी केले. तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल मानबेट पैकी चौके शाळेत दुर्गमानवाड आणि तळगाव केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख एकनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला एकनाथ कांबळे, मच्छिन्द्र मोहिते, चौके हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एम खडके, कोजीमाशी पतपेढीचे चेअरमन जयसिंग पोवार, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सदस्य एम आर पाटील त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर दोन्ही केंद्रातील उपस्थित सर्व मुख्याध्यापकांचे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सुलभक यांचे शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एस एम खडके यांनी प्रास्ताविक केले, डी आर नलवडे यांनी सूत्रसंचलन केले.
प्रमुख मार्गदर्शक आणि सुलभक विशाल कांबळे आणि शितल कांबळे यांनी निपुण केंद्र आढावा निपुण अभियान सुधारित लक्ष्य व अंमलबजावणी,अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन, पालक व एस एम सी सहभाग, मिशन अंकुर, नवभारत साक्षरता, आनंददायी शिक्षण, व्हिएसके ऍप वर डेली अटेंडन्स घेणेबाबतचा व्हिडीओ दाखविणे याबाबत केंद्रातील उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तसेच शासन धोरणावर चर्चा करण्यात आली. विविध प्रकारचे मार्गदर्शन तासिका घेण्यात येऊन प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीत बदल घडवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस पूरक वातावरण तयार करणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.आभार एन एन पाटील यांनी मानले.