Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomeAdministrativeमहावितरणकडून नवीन टीओडी वीजमीटर

महावितरणकडून नवीन टीओडी वीजमीटर

पुणे: नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष व नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टीओडी वीजमीटर वीजग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. हे मीटर प्रीपेड नाहीत. तर सध्याच्या मीटरप्रमाणे पोस्टपेड म्हणजेच वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे आहे. त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नाही. नव्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे मोबाईल फोनवर समजणार असून अचूक बिलिंग होईल. हा मीटर बसवून ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

घरगुती वीजग्राहकांसाठी स्वस्त वीज दराच्या स्लॅबसाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेटमिटरिंग, स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग तसेच वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला मोबाईलवर माहिती कळू शकेल अशा मुख्य सोयी या नव्या वीज मीटरमध्ये आहेत. महावितरणतर्फे  बसविण्यात येणारे नवे टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळत आहेत.

विशेष म्हणजे या नवीन मीटरसाठी महावितरणकडून कोणतेही कर्ज काढण्यात आलेले नाही.  कोणताही अतिरिक्त वीज दर आकारण्यात येणार नाही. पर्यायाने नव्या मीटरमुळे वीज दरवाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्य म्हणजे सेवा पुरवठादार हे केवळ कंत्राटदार आहेत. नव्या वीज मीटरची मालकी तसेच वीज व ग्राहकसेवेचे सर्व अधिकार सरकारी कंपनी असलेल्या महावितरणकडेच राहणार आहे. 

स्वयंचलित मीटर रीडिंगमुळे वीजबिल अचूक – नव्या डिजिटल वीजमीटरमुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक व स्वयंचलित रीडिंग होणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या मोबाईलवर विजेचे मीटर रीडिंग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे दरमहा बिलिंग आणखी अचूक होणार आहे. मीटरचा फोटो अस्पष्ट घेणे, विविध कारणांमुळे मीटर रीडिंग घेता न येणे किंवा नादुरूस्त शेऱ्यामुळे सरासरी किंवा अंदाजे युनिटच्या वीजबिलाचे सध्याचे प्रकार बंद होणार आहे. पर्यायाने चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप देखील टळणार आहे. या सर्व फायद्यांमुळे कोणताही गैरसमज न ठेवता आणि प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा टीओडी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News