राज्यात संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत असतानाच गडचिरोलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी घरात घुसूत माजी पंचायत समितीच्या सभापतीची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. त्यामुळं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी रात्री हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना सभापतींच्या मृतदेहाजवळ पत्रक मिळाले. या पत्रकात हत्येमागचे कारण लिहले असल्याच संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शनिवारी रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावात घुसून मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर ओढून नेले. गावाच्या सीमेजवळ असलेल्या मैदानावर त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह सापडला.
या घटनेमुळं परिसरात पुन्हा नक्षलवाद्यांची दहशत निर्माण झाली असून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. राजकीय नेत्यांच्या हत्यामुळे प्रशासनासमोर आता नक्षल प्रभाव रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.