टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात 2023 साली पहिलाच अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 83 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील बेयुमास ओव्हल स्टेडियमवर स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये खेळवण्यात आला होता. दोन्ही संघांमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संपूर्ण संघाला 20 षटकांत फक्त 82 धावाच करता आल्या. त्यामुळं टीम इंडियाने हे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर गोंगडी त्रिशा आणि कमलिनीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी फक्त 4.3 षटकांत 36 धावा जोडल्या. त्यामुळे भारतीय संघाने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला.