महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पैलवानांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे.
स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीत शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांच्याशी वाद घातला. संतापाच्या भरात त्याने पंचांची कॉलर धरली आणि लाथ मारण्याचा प्रकार घडला. या बेशिस्त वर्तनामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट मैदान सोडले. त्यामुळे परिषदेने या दोन्ही पैलवानांना तीन वर्षांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहे शिवराज राक्षे
शिवराज राक्षे हा मुळचा नांदेडचा आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. जानेवारी 2023 मध्ये पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्याने पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. या मोठ्या विजयानंतर शिवराज राक्षेला महाराष्ट्र सरकारने क्रिडा अधिकारी म्हणून शासकीय नोकरीही दिली होती.
६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा
दरम्यान, ६७ व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत पृथ्वीराजने एका गुणाने विजय मिळवला. विजयानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला, तर त्यानेही आपल्या वडिलांना खांद्यावर उचलून आनंद व्यक्त केला.