अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ६७व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्या पृथ्वीराज मोहोळला मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत चांदीची गदा आणि थार गाडी देखील भेट म्हणून देण्यात आली.
पृथ्वीराज मोहोळच्या विजयामुळे त्याच्या समर्थक आणि चाहत्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.