लाडकी बहीण योजना ही सरकारने लाडक्या बहिणींसोबत केलेली ‘चिटिंग’ असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ही योजना लाडक्या बहीणींसाठी नव्हती तर निवडणूक जिंकण्यासाठी होती असा आरोप कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, याची चौकशी होणे गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने यावर पारदर्शक पद्धतीने विचार करावा. यामध्ये नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करून मतं वळवण्याचा प्रयत्न झाला आहे.
ही योजना लाडक्या बहीणींसाठी नव्हतीच. सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी त्यांनी एकदोन महिन्यांत कुठलाही विचार न करता करोडो लाडक्या बहिणींना कोणतीही चौकशी अथवा चाचपणी न करता पैसे जाहीर करून टाकले. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे महिलांच्या खात्यात टाकले. आणि आता तुम्ही सांगता त्या पत्र नाहीये? पैसे देण्याआधी पात्र ठरवायचं की पैसे दिल्यानंतर पात्र ठरवायचं?, असे सवाल बच्चू कडू यांनी केले.
बच्चू कडू पुढे म्हणाले, हा सरकारने व्यवस्थितपणे केलेला क्राइम आहे. आता येणाऱ्या बजेटमध्ये येत असलेल्या अडचणी बघता लाखो बहिणींना यातून बाहेर काढले जाईल. निवडणुकीत मतं मिळवून घेतली आणि आता पैसे पण बंद करणार आहे. ही लाडक्या बहिणींसोबत केलेली चिटिंग आहे. लाडक्या बहीणींची ही फसवणूक आहे.
या फसवणुकीच्या विरोधात, ज्या लाडक्या बहीणींचे पैसे बंद झाले. त्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.