संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे (वय ३२) यांनी काल (दि.5) रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत टोकाचं पाऊल का उचलले याचे कारण लिहिले आहे. तसेच होणाऱ्या पत्नीला थांबू नकोस, तुझं आयुष्य जग अशी साद घातली आहे.
आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला अन चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना अखेरचा संदेश दिला आहे.
आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात शिरीष महाराज मोरे काय म्हणाले?
“प्रिय मम्मी-पप्पा आणि दिदी, आयुष्यात जे-जे करायचं म्हटलं त्या पाठिशी तुम्ही उभे राहिलात. जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते तुमच्या पाठिंब्याने काही वर्षातच मिळालं. आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय. यात सर्वस्वी दोष माझाच आहे. मला माफ करा”,
सखे, मला माफ कर… शिरीष महाराजांची अखेरची वेदनादायी साद
चिठ्ठीमध्ये होणाऱ्या पत्नीचीही त्यांनी माफी मागितली. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती. पण ती पूर्ण न करता मी निघालो आहे. पण माझी सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.
मित्रांना विनंती
“प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय… खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा”, असं शिरीष मोरे अखेरच्या पत्रात म्हणाले आहेत.
शिरीष महाराज मोरे यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. तर येत्या महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. स्वतः ची इच्छा नसतानाही घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी लग्नाला होकार दिला होता. मात्र, त्यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.