छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. चकमकीदरम्यान चार जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिसरात अजुनही शोध मोहीम सुरू आहे.
रविवारी सकाळी बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना चकमक सुरू झाली. या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान चार सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन सैनिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोन जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.