Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialपुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला चावला उंदीर ; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला चावला उंदीर ; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उंदराने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याच्या पायाच्या बोटाला चावा घेतल्याने त्याला पिंपरी चिंचवड जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या उपचार सुरू आहेत. यामुळे वसतिगृहात भीतीचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांनी उंदरांचा धसका घेतला असून त्यांची झोप उडाली आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असताना विद्यापीठ प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे विद्यापीठात सातत्याने काही ना काही प्रकार घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे की या समस्या सोडवाव्यात असा त्यांना प्रश्न पडला आहे. वसतिगृहात उंदरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्याला उंदीर चावल्याने त्याला दोन दिवस रुग्णालयात काढावे लागले. तसेच, विद्यार्थ्यांच्या साहित्याचे या उंदरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, वसतिगृहात उंदीर तसेच साप आढळल्याबद्दल वसतिगृह प्रमुख तसेच विद्यापीठ प्रशासनाकडे सुमारे तीन महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. ही तक्रार गंभीर असताना देखील प्रशासनाने डोळ्यावर पट्टी आणि कानावर हात ठेवले असून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे, असा संतापजनक आरोप विद्यार्थ्यांकडून केला जाऊ लागला आहे.

विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक ६ च्या खोली क्रमांक २२ मध्ये चार विद्यार्थी राहतात. या खोलीतल्या विद्यार्थ्यांना उंदरांचा त्रास होत आहे. या ठिकाणी उंदरांचा उपद्रव  वाढला असून त्यामुळे सापांचा वावर वाढल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या संदर्भात हिंदी आणि अर्थशास्त्र  विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की, या संदर्भात वसतिगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र वसतिगृह प्रशासनाने या विषयाची कोणतीही दखल घेतली नाही.

विद्यापीठाच्या हिंदी विभागात शिक्षण घेत असलेल्या महेश जाधव या विद्यार्थ्याच्या पायाला उंदीर चावला.  त्याला रुग्णालयात दोन दिवस भरती होऊन उपचार घ्यावे लागले.  या संदर्भात त्याने मुख्य वसतिगृह प्रमुखांना निवेदन दिले. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही संवेदनशीलता दाखवली नसल्याचे जाधव याने सांगितले. 

उंदरांनी केली सामानाची नासधूस

विद्यार्थ्याच्या पायाच्या बोटाचा चावा घेण्यासोबतच उंदरांमुळे वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या साहित्याचे  मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तकांना उंदरांनी कुरतडले आहे. अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांच्या झोपण्याची सुविधा नाही.  त्यांना त्वरित नवीन खोली उपलब्ध करून द्यावी व  नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अर्थशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या  राजेंद्र भोसले  नावाच्या एका विद्यार्थ्याने  सीविक मिररशी बोलताना सांगितले की, मी वसतिगृह क्रमांक ६ मध्ये राहतो. नोव्हेंबर महिन्यापासून आम्हाला उंदरांचा त्रास होत आहे. उंदरांनी माझे कपडे तसेच बॅग कातरले आहे. त्यामुळे माझ्या कपड्यांचे  तसेच बॅगेचे नुकसान झाले आहे. याविषयी मी मुख्य वसतिगृह प्रमुखांकडे सातत्याने तक्रार केली. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. माझी त्वरित दुसऱ्या जागेवर राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News