मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं राजकीय हालचालींना वेग आला. या भेटीवरुन अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट केलं आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या. दोघांमध्ये सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात उधाण आलं. भेटीमागं नक्की कारण काय? दोघांमध्ये काय चर्चा झाली? आगामी निवडणुकीत भाजप मनसे पक्षाची युती होणार..असं अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. दरम्यान, भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
बंद दाराआड काय झाली चर्चा ?, फडणवीस स्पष्टच बोलले
चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. असं फडणवीस माध्यमांना उद्देशून म्हणाले. तसेच, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.
काही दिवसांपूर्वी, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचं गणित मांडत विधानसभा निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला होता. तसेच, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं फडणवीस- ठाकरेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता अख्ख्या राज्याला होती.