प्रयागराज : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (१० फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. पांढऱ्या साडीत पवित्र स्नान केल्यानंतर, त्यांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर उभे राहून प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपतींनी गंगा आरती व पूजादेखील केली.
१३ जानेवारी रोजी सुरू झालेला भव्य महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांना हा सोहळा आकर्षित करतो. महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न होईल.
राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्रिवेणी संगमावर उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, स्नानानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिराला भेट दिली. त्यानंतर, त्या डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले होते.
महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करणारे राष्ट्रपती मुर्मू या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. याआधी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही महाकुंभमेळ्यात स्नान केले होते.
गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला भेट देऊन संगमात पवित्र स्नान केले होते. मंत्रोच्चार आणि प्रार्थनेसह त्यांनी ‘रुद्राक्ष’ माळ हाती घेत स्नान केले. त्यानंतर त्यांनी गंगा आरती आणि पूजन केले.
उत्तर प्रदेश सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत महाकुंभमेळ्यात ४० कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे.
या कुंभमेळ्यात अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनीही स्नान केले आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा, अभिनेत्री हेमा मालिनी आणि अनुपम खेर तसेच ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवाल यांचा समावेश आहे.