शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकिकडे शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे नवनिर्वाचित आमदारांना दिलेल्या निमंत्रणामुळं शिंदेंच्या मनात नक्की काय सुरुय? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यातील नवनिर्वाचित आमदार प्रशिक्षणासाठी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी काही आमदार दाखल झालं आहेत. ही संधी साधत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे. यामध्ये ठाकर गटाच्या आमदारांचीदेखील नावं असल्याची माहीती समोर आली आहे.
मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांनी मोठा निर्णय घेतला असून स्नेहभोजनास जाण्यास नकार दिला आहे. अशी माहिती समोर आली आहे. तर काही आमदारांनी आपल्याला निमंत्रणच आलं नसल्याचं सांगितलं आहे. ठाकरे गटाचे दहा नवर्निर्वाचित आमदार आहेत. त्यातील सात दिल्लीत आहेत तर तीन मतदारसंघात आहेत. मात्र, त्यापैकी कोणीही स्नेहभोजनास जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरु आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळं ठाकरेंच्या प्रत्येक नेत्यासह कार्यकर्त्यांकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागले आहे