शिवसेनेचे (शिंदे गट) मराठवाड्यातील आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाला होता. ऋषिराज याचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ऋषिराज याचे पुणे विमानतळावरून अपहरण झाले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ऋषिराज आपल्या दोन मित्रांसोबत चार्टर विमानाने बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान ऋषिराज सुखरूप लोहगाव विमानतळावर दाखल झाला. यादरम्यान ऋषिराजने सुमारे ६८ लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या अचानक बेपत्ता होण्याने सोमवारी खळबळ उडाली. पुणे विमानतळ परिसरातून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते. पुणे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला होता.
दरम्यान, मुलगा अचानक संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीयांनी घाबरून तातडीने पुणे पोलिसांकडे मदत मागितली. सावंत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत विमानतळ आणि शहरातील विविध ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. चौकशीत ऋषिराज आपल्या मित्रांसोबत खासगी विमानाने परदेशात गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधून विमानाच्या कॅप्टनशी बोलण्यास सांगितले. बँकॉककडे उड्डाण केलेले विमान तत्काळ वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि ते विशाखापट्टणम विमानतळावर उतरवण्यात आले. रात्री उशिरा हे खाजगी विमान लोहगाव विमानतळावर उतरले.
संध्याकाळी पाचच्या सुमारास ऋषिराज सावंत आपल्या दोन मित्रांसह कात्रज येथील कार्यालयातून निघून लोहगाव विमानतळावर पोहोचला. कॅब चालकाने ही माहिती माजी सावंत यांना दिली. मात्र मुलाने कुठे जात आहे याची कोणतीही कल्पना कुटुंबीयांना दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण शहरात शोधमोहीम हाती घेतली.
विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित खासगी विमानातील प्रवाशांची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर सर्व विमान कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मुलगा परदेशात जात असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, माजी मंत्री स्वतः पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. मुलगा अचानक कुठे निघून गेला हे आम्हाला ठाऊक नव्हते, त्यामुळे काळजी वाटल्याने पोलिसांकडे मदत मागितली, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुलगा आणि त्याचे मित्र दुपारी खासगी विमानाने बँकॉककडे रवाना झाले होते. त्यानंतर ऋषिराजने विमानासह मित्रांची माहिती कुटुंबीयांना समाज माध्यमातून संदेशाव्दारे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत विमान कंपनीशी संपर्क साधून विमानाचे मार्ग बदलण्याची कार्यवाही केली. शेवटी विमान विशाखापट्टणम येथे उतरवण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा हे खाजगी विमान लोहगाव विमानतळावर उतरले.