शिवसेनेचे (शिंदे गट) मराठवाड्यातील आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाला होता. ऋषिराज याचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात जात होती. तानाजी सावंत यांनी मुलाच्या काळजीपोटी पोलिस ठाण्यात थेट धाव घेतली. मात्र, ऋषिराज घरी न सांगता दोन मित्रांसोबत चार्टर विमानाने बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता अशी माहिती समोर आली. तेवढ्यात, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावत तानाजी सावंत यांना मोठा दिलास दिला.
मुरलीअण्णा ठरले Game Changer
तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिसांपासून ते केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय कामाला लागल्याचे पाहयला मिळाले. ऋषिराज सावंत याचे विमान पुन्हा पुण्याला आणण्यात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ऋषिराज सावंतच्या चार्टर्ड प्लेनच्या पायलटशी थेट संपर्क साधला. एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या पायलटशी संपर्क साधला तेव्हा विमान बंगालच्या उपसागरावरुन उड्डाण करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी एटीसीने पायलटला विमान घेऊन माघारी आणण्याचे आदेश दिलं. यावेळी ऋषिराजला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले तेव्हा बाहेरचे दृश्य बघताच ऋषिराजला आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे विमानतळावरच काल ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. मात्र या जबाबात ऋषिराजने नेमकी काय माहिती दिली हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिराज सावंतसोबत खासगी विमानाने प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र बँकॉकला निघाले होते. मात्र, तानाजी सावंत यांनी नेमक्या कोणत्या कारणावरुन ऋषिराजबद्दल अपहरणाची तक्रार दिली याची कसून चौकशी पोलिस करणार आहेत.
अशातच, ऋषिराजने बँकॉकला जाण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याची माहिती मिळाली आहे. 68 लाख रुपये देऊन एका खासगी विमानाने ऋषिराज सावंत बँकॉकला निघाले होते. बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी विमानाचे बुकिंग केले होते असं सांगण्यात येत आहे.