मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध शहरांत जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) या आजाराचा संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत या आजारमुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जीबीएसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात पुणे शहरात आढळून आले आहे.
अशातच मुंबईत देखील जीबीएसच्या संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या एका ५३ वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत जीबीएसमुळे झालेल्या रुग्णाच्या मृत्यूमुळे मुंबईकरांचं टेंशन वाढलं आहे.
दरम्यान, मृत्यू झालेला रुग्ण हे ५३ वर्षीय होते. ते वडाळा येथील रहिवासी होती. तसेच मुंबई महापालिकेच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून ते काम करत होते.
नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या महितीनुसार, संबंधित रुग्ण हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात आतापर्यंत जीबीएस चे १९७ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७२ रुग्णांना जीबीएस झाल्याचं निश्चित झालं आहे.