उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर तोफ डागत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं राज्यात, राजकारण चांगलेच तापलं आहे. या वरुन राऊतांवर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, राऊतांच्या नाराजीवर शरद पवारांची प्रतिक्रिया काय असले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तर खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय होती याची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तसंस्थेच्या विशेष मुलाखतीत, खासदार निलेश लंके बोलत होते. एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. संजय राऊत हे स्वत: बोलत आहेत की, त्यांच्या तोंडून दुसरं कोणी हे वदवून घेत आहेत? असा प्रश्न निलेश लंकेंना यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी निलेश लंकेंनीही संशय व्यक्त केला. संजय राऊत यांच्याकडून असं वक्तव्य कसं गेलं,असा प्रश्न आम्हालाही पडला असल्याचे लंकेंनी यावेळी म्हटंले. तसेच, ही न्यूज पाहून आम्हीही शॉकेबल झालो असं सांगत शरद पवारांची राऊतांच्या टीकेवर काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं.
संजय राऊतांच्या नाराजीवर शरद पवार मिश्कीलपणे हसले
सत्कार सोहळ्यावर संजय राऊतांची टीका पाहून पवारसाहेब मिश्कीलपणे हसले. आम्ही 6 जनपथला होतो, पवारसाहेबांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, पण ते मिश्कील हसले, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मीतहास्य होतं, असं निलेश लंके यावेळी म्हणाले.
राऊतांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर डागली तोफ
ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. काल शरद पवारांनी शिंदेंचा नाही, तर अमित शाह यांचा सत्कार केला..हे दुर्दैव आहे,अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.
शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहच्या सहकाऱ्यानं तोडली, अशा लोकांना आपण सन्मानित करता, पवारसाहेब आम्हालाही राजकारण कळतं, असा इशारा देत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. असं राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.
तसेच शरद पवार यांनी ठाण्यासंदर्भात सांगितलेल्या मुद्यावरही राऊतांनी भाष्य केलं. ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशिराने आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागली, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.