राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र सातत्याने पाहायाल मिळत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज आहेत तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सरकारमध्ये स्थान न मिळाल्यामुळं नाराज आहेत. अशातच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांकडून हालचालींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर ग्रुपमध्ये छगन भुजबळांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रक जारी करत जाहिर केली.
या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षसंघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे तटकरेंनी म्हटलं आहे.
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मनधरणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्यानंतर भुजबळांची नाराजी काहीशी निवळली असल्याचे सांगण्यात येत आहे