निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मोठ्या अडचणी येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरेंचे निष्ठावंत समजले जाणारे राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले पण आणखी एका कार्यकर्त्यांने पत्र लिहित ठाकरेंना धक्का दिला आहे. या कार्यकर्त्याने पत्रामध्ये मनात साठलेली खदखद व्यक्त केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन जाणारे शिवसैनिक जितेंद्र जानावळे यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी जानावळे यांनी विभाग प्रमुख अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र लिहलं आहे. जानावळे यांनी हे पत्र त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
जानावळे यांनी पत्रामध्ये अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला पक्षामध्ये जाणून बुजून डावलले जात असून यासंबंधीची व्यथा मांडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अनेक क्षमता असताना सुद्धा डावलले जात आहे. त्यामुळं आपण राजीनामा देत असल्याचे जितेंद्र जानावळे यांनी पत्रात लिहिलं आहे. तसेच, विभाग प्रमुख अनिल परब यांनी आपल्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे. यासोबत, मागील सहा वर्षे कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्ती करून राजकीय गोची करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप जानावळे यांनी पत्रामध्ये केला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे पत्रात?
‘साहेब मला माफ करा…’
मी आपणाकडे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझ्या “उपविभागप्रमुख” पदाचा राजीनामा देत आहे.
साहेब, गेली सहा वर्ष मला माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करून माझी राजकीय गोची करण्याचे षडयंत्र विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. साहेब गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी घर सोडून भाजपाच्या विरोधात निवडणूक जोमाने लढलो. अवघ्या थोड्याच मतांनी हरलो, पण खचलो नाही आणि परत जिद्दीने माझे संघटनात्मक जनसेवेचे, रुग्णसेवेचे काम विभागात चालू ठेवले डोक्यात एकच विचार होता एकदा तरी विलेपार्ले विधानसभेतील माझ्या वॉर्ड ७१ मध्ये विजयाचा भगवा फडकविणार पण दुर्दैव मला विभागप्रमुख मा अनिल परब साहेबांनी गेली सहा वर्ष विभागातून बाजूच्या विधानसभेत म्हणजे बाहेर ठेवले वारंवार विभागप्रमुख मा. अनिल परब साहेबांना विभागात परत घेण्याची विनंती मी केली पण त्यांनी फक्त तारखाच दिल्या आणि निराशा केली. एवढेच नाही तर मी वास्तव्यास असलेल्या असलेल्या विलेपार्ले विधानसभेच्या बैठकींना मी स्थानिक पदाधिकारी नसल्यामुळे मला अपमान ही सोसावा लागला. हे सर्व मला डावलण्याचे प्रकार माझ्या सोबत जाणूनबुजून होत होते हे मला जाणवत होते. तरी ही मी सहा वर्ष संयम ठेऊन संघटना वाढीसाठी काम करीत राहिलो.
साहेब, या बाबत मी आपल्याला आणि मा. आदित्य साहेबांना मातोश्री येथे प्रत्यक्ष भेटून विभागात चुकीच्या पद्धतीने चाललेल्या संघटनात्मक पद्धतीची व्यथा मांडली परंतु आपणाकडून ह्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही.
साहेब, आंदोलनात पुढे असणारा, पोलिसांच्या लाठ्या खाणारा, आंदोलनाच्या केसेसबाबत कोर्टात फेऱ्या मारणाऱ्या माझ्या सारख्या संघटनात्मक व सामाजिक करणाऱ्या शिवसैनिकाची जर ही परिस्थिती होत असेल तर नेमका निकष काय लावला ? हा प्रश्न मनाला भेडसावतो.
साहेब, या सर्व संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो असून मला कोणाच्या दबावाखाली आणि कार्यरत असलेल्या विभागाच्या बाहेर पदाधिकारी म्हणून काम करायला एक शिवसैनिक म्हणून जमणार नाही.
साहेब, माझी क्षमता असतानाही मला डावलण्यात येते हे मी किती दिवस सहन करायचे हा विचार करत बसण्यापेक्षा मी माझ्या “उपविभागप्रमुख” पदाचा राजीनामा जड अंतःकरणाने आपणाकडे या पत्राद्वारे देत आहे.
“साहेब मला माफ करा”