बालिंगे (प्रतिनिधी मोहन कांबळे): कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगे(ता. करवीर) येथील संजय पाटील यांची महावितरणच्या मुख्य अभियंता पदी सरळ सेवेतून निवड झाली आहे. त्यांनी प्रकाशगड, मुंबई येथे वीज खरेदी विभागात नुकताच पदभार स्विकारला आहे. यापूर्वी ते महावितरणच्या वाशी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत होते.
सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या संजय शंकर पाटील यांनी आपले प्राथमिक शिक्षण बालिंगे हायस्कूल येथून पूर्ण केले आहे. तर विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथून व पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.
संजय पाटील हे तत्कालीन एमएसईबी मध्ये कनिष्ठ अभियंता(चाचणी) पदावर २००४ साली रुजू झाले. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता या सर्व वरिष्ठ पदांवर सरळ सेवेतून निवड होत त्यांनी आपला यशाचा आलेख उंचावत ठेवला. त्यांनी आज अखेर कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, वाशी, मुंबई येथील वीज ग्राहकांना महावितरणच्या माध्यमातून सेवा दिली आहे.
उल्लेखनीय कामगिरी
महावितरणच्या उच्चदाब ग्राहकांकरिता केव्हीएएच(KVAH) बिलिंग लागु करण्यात संजय पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. तसेच मुंबई जवळील जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर समुद्रातून केबलद्वारे वीज पुरवठा सुरू करण्याच्या मोहिमेमध्ये विशेष योगदान दिले आहे. याच बरोबर महावितरणच्या चाचणी प्रयोगशाळेस सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय ‘एनएबीएल मानांकन’ मिळवण्यात संजय पाटील सिंहाचा वाटा राहिला आहे.