जगभरात आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. सर्वस्तरवरील लोक विविध माध्यमांमधून शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याककडून मोठी चूक झाली आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांची ही ट्विटर पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींनी आपला एक जुना फोटो पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये राहुल गांधी शिवरायांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना राहुल गांधींनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात होणार आहे. शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख या पोस्टमध्ये असल्याने अनेकांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख करतात. श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथीच्या संदर्भातून वापरला जातो.