कोल्हापूर : ज्यांच्याकडे समस्या सोडविण्याची भूमिका आहे अशांना ही समस्या आपली आहे, असे वाटतच नाही. ते नेहमी गिऱ्हाईक म्हणूनच त्यांच्याकडे पाहत असून, समस्या सोडविणाऱ्यांमधील आत्मीयता संपल्यानेच जग चिंताग्रस्त बनले आहे, दुसर्याचे दुःख माझे आहे, असे वाटणे म्हणजे करुणा. हा करुणेचा भाव जागा झाला की, नैतिक जबाबदारी आणि नैतिक उत्तरदायित्व आपसूक येते आणि समस्यांचे प्रभावी निराकरण होते. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी असे काम करत राहतो तोच खरा नेता अन् सामाजिक कार्यकर्ता असतो, याच भावनेतून काम करणार्या डॉ. संजय डी. पाटील यांचा वाढदिवस हा केवळ त्यांचा वैयक्तिक उत्सव नसून, त्यांच्या रुग्णालयातून बरे झालेल्या लाखो रुग्णांच्या चेहर्यावर उमटलेल्या आनंदाचा, तसेच शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव आहे. समाजासाठी डॉ. संजय पाटील यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार ‘नोबेल’ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी काढले.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमास खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सुमेधा सत्यार्थी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, डॉ. पी. डी.पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
“ट्रांसफार्मिंग हायर एज्युकेशन जर्नी इन टू न्यू डायमेन्शन” या ग्रंथाचे व “ध्यास पर्व” या डॉक्टर संजय डी पाटील यांच्यावरील जीवन गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार राजू बाबा आवळे ,कुलगुरू डॉक्टर आर के मुद्गल ,डॉक्टर के प्रथापन ,डॉ. ए के गुप्ता ,डॉ .व्ही व्ही भोसले, डॉ.आर के शर्मा ,मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील ,डॉ भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे ,पृथ्वीराज पाटील ,तेजस पाटील देवश्री पाटील ,पूजा पाटील ,वृषाली पाटील ,आर के शर्मा आदी उपस्थित होते.