गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हिंदूधर्मीयांच्या श्रद्धेचे केंद्र ठरत असलेल्या प्रयागराजमधील गंगा नदीच्या पाण्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे. मात्र, या पाण्यात मोठ्याप्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिली आहे. सीपीसीबीने हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) मुख्य खंडपीठासमोर सादर केला. या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाविक जिथे स्नान करत आहेत, त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने 12 आणि 13 जानेवारीला जमा करण्यात आले होते. त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्याच्या विष्ठेत असणारे जिवाणू सापडले आहेत. संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजे पाणी सोडले जाते. तरीही याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्ठा केल्याचेही प्रकार समोर आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळेच गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात प्रदूषण होऊन जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे.
तब्बल 144 वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केले आहे. इतक्या प्रचंड संख्येने लोक नदीत स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यात एफसीचे प्रमाण वाढल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे. महाकुंभदरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सगळ्याची तपासणी राष्ट्रीय हरित लवादाकडून केली जात आहे.