उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इतकेच नव्हे तर पत्रामध्ये त्यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह भाषादेखील वापरण्यात आली आहे.
बुलढण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवले? हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.
‘तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती,’ असा उल्लेख या पत्रात लिहलं असल्याचं श्वेता महाले यांनी स्वतः सांगितलं आहे. तसेच, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा या पत्रातील मजकूर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. धमकी देणाऱ्या लोकांविरोधात सरकारने ठोस पाऊलं उचलली पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया श्वेता महाले यांनी दिली आहे.
काल उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावच्या मही येथून अटक करण्यात आली आहे. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे अशा या दोन आरोपींना मुंबई एटीएसने(ATS) अटक केली आहे. ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने ‘आतेभाऊ-मामभाऊ’ आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी शुक्रवारी मुंबईतील काही पोलीस ठाण्यांना मिळाली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.