मुंबई : शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली आहे. दादरमधील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंसोबक २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाविषयी संवाद साधला असल्याचे देखील सांगितले आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, “पुण्यात विश्व मराठी संमेलन झालं होतं. त्यावेळी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्याला ते उपस्थित राहिले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांची माझी भेट झाली नव्हती. त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी इथे आलो होतो. आज आमच्यात मराठी भाषेसंदर्भात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या बद्दल गप्पा मारल्या. राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. राज ठाकरेसमवेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात” असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.