उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक दावा ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे बोलत होत्या.
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
दोन मर्सिडीज दिल्या की एक पद….
2012 पासून शिवाजी पार्कवर झालेलं आत्तापर्यंतचे सर्व कार्यक्रम मला आठवतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम शिंदेंना दिलं होतं. असं सांगत आता फार तपशीलात जात नसल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी म्हटलं. तसेच, साहित्यापेक्षा तुम्हा माझी राजकीय मुलाखत करणार आहे हे मला माहिती होते. त्यामुळं जर वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं कौतुक करता आलं असते. असही यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.
पुढे शिंदे गटात प्रवेशाबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथं नकोसे झालोय हे समजावं. सध्या सगळीकडे एकच पंगत राहिली आहे. वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे..?
मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला असं निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. तसेच पक्षातील अनुभव सांगताना, ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यानंतर नीलम गोऱ्हेंच्या विधानावर अंबादास दानवे यांनी ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाही, असं अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं.