Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeगुंड गजा मारणे टोळीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; संपत्ती होणार जप्त

गुंड गजा मारणे टोळीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; संपत्ती होणार जप्त

भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर गजा मारणे टोळीकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढली. दरम्यान त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसेच, टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 

पत्रकार परिषदे घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारावाईसंदर्भात माहिती दिली. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या तिघांवर कारवाई करत त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची आमची भूमिका आहे. एकूण 27 जण आमच्या रडारवर आहेत. असं पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. 

तसेच, गजा मारणे टोळीच्या संपूर्ण राज्यातील संपत्तीची माहिती घेण्याच काम पोलिस करत आहेत. संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरटीओकडून त्यांच्या वाहनांची माहिती घेतली जात आहे. वाहने जप्त करणार. यासोबतच, त्यांच्या बांधकामाची माहितीदेखील महापलिकेककडून घेणार असून त्यांची बांधकामे पाडणार असल्याचेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. 

अमितेश कुमार यांचा गुंडांना इशारा

आमच्या इथे पोलिस स्टेशनला कोणीही आका, बाका, काका येत नाही. तुम्ही गुन्हा करु नका. गुन्हा केलात तर तुमच्या सात पिढ्यांना अद्दल घडेल अशी कारवाई करु असा इशाराही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी गुंडांना दिला. 

हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून काढली धिंड

 पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या  तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढली.  गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवल. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

केंद्रीयमंत्र्यांनी पुणे पोलिसांना खडसावलं

घटनेनंतर केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांची कानउघडणी केली होती. पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, पुणे पोलीस डोळे बंद करुन बसलेत का? अशा भाषेत मोहोळ यांनी  पोलिसांचा समाचार घेतला होता.  ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. तर अद्याप एक जण फरार आहे, फरार असलेला आरोपी हा गुंड गजा मारणेचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News