Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomeEducationशाळा १ एप्रिल नव्हे; जूनमध्येच सुरू होणार

शाळा १ एप्रिल नव्हे; जूनमध्येच सुरू होणार

शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलेले असताना, शिक्षण आयुक्तांनी मात्र येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित पद्धतीनुसार शाळा जूनमध्येच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, याबाबत अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम सुरू केले आहे,’ असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे राज्यभरातील शाळा, पालक, संस्थाचालक, शिक्षक अशा सर्वच घटकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. अर्थात, त्याचे पुरेसे स्पष्टीकरण न मिळाल्याने या संदर्भात संभ्रमाचेच वातावरण होते.

या पार्श्वभूमीवर, राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या बदलांविषयी माहिती देताना सांगितले की, पहिली आणि शक्य झाल्यास दुसरीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी नवी पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. तर अध्यापन पद्धतीत बदल केले जातील. मात्र, याचा परिणाम शाळांच्या वेळापत्रकावर होणार नाही आणि शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्येच सुरू होतील.

येत्या शैक्षणिक वर्षात प्रचलित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे शाळा जूनपासूनच सुरू होतील. शाळा सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल करायचा झाल्यास त्याबाबत सविस्तर चर्चा करणे, तसेच योग्य वेळ देणेही आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्यात आला आहे. त्यात नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याबरोबरच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) शैक्षणिक वेळापत्रक राज्यातील शाळांनाही लागू करण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शाळाही १ एप्रिलपासून सुरू करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. 

मात्र, राज्यातील प्रत्येक भागातील स्थिती वेगळी असल्याने प्रचलित वेळापत्रक बदलून १ एप्रिलपासून शाळा सुरू करण्यास विरोध आहे. अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, तसेच शिक्षण विभागानेही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. शिक्षण संस्थेच्या या नव्या नियमानमुळे शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शालेय शिक्षण विभागाचा खुलासा

बदलत्या नियमांबाबत स्पष्टीकरण देताना शालेय शिक्षण विभागाने म्हणले आहे की, शाळांचे वेळापत्रक जुनपासूनच सुरू राहणार असून केवळ पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. हा अभ्यासक्रम राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार केला जात आहे. जो सीबीएसईच्या धर्तीवर बनवलेला असेल. तसेच, इतर वर्गांसाठी कोणताही बदल होणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

पहिलीच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल

दरम्यान, राज्य सरकारने शालेय शिक्षण प्रणाली अधिक आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यासाठी हे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार होणारा हा अभ्यासक्रम सीबीएसईच्या पद्धतीनुसार असेल. मात्र तो राज्य शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचा लाभ मिळेल. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतही मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे, यंदाच्या वर्षापासून शाळा या जूनमध्येच सुरू होणार आहेत. तसेच, पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होईल, त्यामुळे या सगळ्याबाबत पालक काय प्रतिक्रिया देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News