Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialजिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालकांच्या भाडेदरात 1 मार्चपासून वाढ

जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालकांच्या भाडेदरात 1 मार्चपासून वाढ

कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता (कोल्हापूर व इचलकरंजी) ऑटोरिक्षांसाठी रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 25 टक्के अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय राहील. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 40 टक्के अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय राहील. प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी 3 रु. इतके शुल्क अनुज्ञेय राहील. नमुद भाडेदर सुधारणा दिनांक 1 मार्च पासून लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणिकरण (Meter Calibration) करण्यासाठी दिनांक 1 मार्च पासून 31 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. दिनांक 1 मार्च पासून ऑटोरिक्षांकरिता सुधारित भाडेदर लागू होत असल्याने, जे ऑटोरिक्षाधारक दिनांक 1 मार्च 2025 पासून मीटर पुन:प्रमाणीकरण करुन घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडेसुधारणा लागू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने भाडे सुधारणेबाबत विविध रिक्षा संघटनांना वेळोवेळी अवगत करण्यात आले होते व याबाबत त्यांच्या शिफारसी भाडेसुधारणा करताना विचारात घेण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारसीस अनुसरुन बैठकीमध्ये जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता ऑटोरिक्षा भाडेसुधारणेबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
किमान देय भाडे – सद्याचा भाडेदर – 22 रुपये व सुधारित भाडेदर 25 रुपये, त्यापुढील प्रत्येक किमी साठी देय भाडे – 18 रुपये वरून सुधारित भाडेदर 23 रुपये याप्रमाणे असणार आहे. ऑटोरिक्षा भाडेवाढ दिनांक 1 मार्च 2025 पासून लागू होणार आहे.

जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनःप्रमाणीकरण करुन घेणार नाहीत त्यांच्यावर पुढीलप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. विहित मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस तथापी कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रु. मात्र किमान 500 रु. तथापी कमाल तडजोड शुल्क 2 हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असेही श्री. भोर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News