स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळी आहे. त्यात आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा आढावा घेतला. परंतु योगेश कदम यांची कार अडवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तृप्ती देसाई आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत मत व्यक्त करताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, महाराष्ट्रातले सर्वात मोठे बस स्थानक आहे. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का एसटीमध्ये प्रवास करण्याचा वाढलेला आहे. सरकारची ही यंत्राणा असल्यामुळे महिला जास्त एसटीने प्रवास करतात. परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती भयंकर आहेच, भयानक आहे हा प्रकार. आरोपी 48 तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही. पोलिस नेमकं काय करत आहेत? महिलांच्या अब्रूची लक्तर पुण्यात वेशीवर टांगण्यात आलेली आहे. आज कॅब चालकाचे प्रकरणा आहे, तिथे देखील महिलेला कॅब मधून उडी मारावी लागली. असे अनेक प्रकार राज्यात होत आहेत, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.