पन्हाळा प्रतिनिधी: पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथे भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. शौर्य रवींद्र निगडे (रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला.
या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक शिवाजी रवींद्र थोरात (वय 25, रा. बीड) यास पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शौर्य हा सायकलने सायंकाळी घरी जात होता. शिवाजी थोरात या चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह बेदरकारपणे चालवून मागून त्याला जोराची धडक दिली. या धडकेत शौर्य गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.