पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 70 तासानंतर स्वारगेट येथील अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते आणि तो गावातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीने पोलिसांकङून श्वान पथक बोलावून तसेच ड्रोनच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला जात होता. त्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीसांच्या हाती लागला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शिरूर येथून रात्री तीन- सव्वातीनच्या सुमारास पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे.
नेमकं काय घङलं….
पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या एका तरुणीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार (Swargate Rape case) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली गेली होती. प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचं समोर आलं. तसेच त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल असल्याचं समोर आलं.
शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच पोलिसांकडून आरोपीला पकडून देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र, आरोपीला पकङण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.