काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यात काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधान परिषदेतील गटनेतेपदी, तर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांची विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नावे जारी केलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार, सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधान परिषदेतील गटनेतेपदी, तर आमदार अमित देशमुख यांची विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय अमीन पटेल यांची विधानसभेतील उपनेतेपदी, अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी, विश्वजीत कदम यांची सचिवपदी, शिरीषकुमार नाईक यांची प्रतोदपदी व संजय मेश्राम यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी व प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनियुक्त्यांमुळे काँग्रेसच्या हायकमांडने तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे.