भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे प्रत्येक सामन्यात काही ना काही मोठे विक्रमाची नोंद होत असते. पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून अनेक मोठे विक्रम करणाऱ्या किंग कोहलीने आता न्यूझीलंडविरुद्धही इतिहास रचला आहे. कोहलीने सामन्यात फक्त ११ धावा केल्या असल्या तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. असा विक्रम करणारा कोहली पहिलाच खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांना विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. या सामन्यात कोहली फक्त ११ धावा काढून मॅट हेन्रीचा बळी ठरला. ग्लेन फिलिप्सने सुपरमॅनसारखा हवेत उडून झेल घेतला आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात मैदानात उतरताच कोहलीने ३०० एकदिवसीय सामने पूर्ण केले आहेत.
कोहली ३०० एकदिवसीय सामने खेळणारा ७वा भारतीय खेळाडू बनला आहे. यासह, विराट कोहली एकदिवसीय स्वरूपात ३००, टी२० स्वरूपात १०० आणि कसोटी स्वरूपात १०० हून अधिक सामने खेळणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु तो एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये अजूनही खेळत असतो.
कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किंग…
किंग कोहलीने आतापर्यंत टीम इंडियासाठी ३०० एकदिवसीय, १२३ कसोटी आणि १२५ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण २७५०३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ८२ शतके आणि १४२ अर्धशतके देखील समाविष्ट आहेत. आयसीसी स्पर्धांमध्येही विराट कोहली टीम इंडियासाठी उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतो. टीम इंडिया ४ मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सेमीफायनल सामना खेळणार आहे. जिथे किंग कोहलीच्या बॅटमधून मोठी इनिंग (खेळी) दिसू शकते.