पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मंत्र्यांच्या मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही टवाळखोरांनी रक्षा खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची छेड काढली. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. या छेडछाड प्रकरणात सात पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या आरोपींमध्ये एक आरोपी हा भाजपचा माजी नगरसेवक असून सध्या तो शिंदे गटात असल्याची माहिती समोर आली आहे.
या छेडछाड प्रकरणात सात पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी अशी नाव अटक केलेल्या आरोपींची आहेत. आरोपींमध्ये समावेश असलेला अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे.
तर पीयूष मोरे हा पूर्वीचा भाजपाचा माजी नगरसेवक राहिलेला असून काही दिवसांपूर्वी तो आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आहे. तो सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. तर सचिन पालवे हा शिंदे गटातील युवा शहर प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे शिवसेना शिंदे गटात पदावर नसले तरी ते शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता संशय
मंत्र्यांच्या मुलींची पोलीस सुरक्षा असताना देखील छेड काढली जात असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता. मुख्यमंत्री म्हणाले की, “आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. दुर्दैवाने त्यात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काहींना अटक केली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल,” असे मत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
नेमकं काय प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीमध्ये भरलेल्या मुक्ताई यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेड काढण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली.