समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं केलेलं कौतुक त्यांना भोवलं आहे. अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी आझमी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती,’ असे वक्तव्य आझमी यांनी केलं होते. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही उमटलं. सत्ताधारी विरोधकांसह सभागृहात गोंधळ घातला.
अखरे अबू आझमी यांच्याविरोधात सरकारने कारवाई केली आहे. अर्थ संकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत. त्यांना विधान भवन परिसरात येण्यास बंदी असेल” असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
किती काळासाठी त्यांचं निलंबन करण्यात यावं यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी आपली आक्रमकपणे भूमिका मांडली होती. याचदरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर करत अबू आझमींचं निलंबनावर शिक्कामोर्तब केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
सभागृहात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की, अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता, असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ही त्यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की, अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे.
तो औरंग्या लुच्छा होता..मुनगंटीवार आक्रमक
औरंग्या बदमाश, लुच्छा, लफंगा असं म्हणत सुधीर मुनगंटीवर यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभा गाजवली. महोदय, अबू आझमींचं निलंबन हे फक्त हे अधिवेशन संपेपर्यंतच का? छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव किंवा देवापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अबू आझमींनी केला आहे.
औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता. औरंगजेबाच्या बापानेही काय म्हटलं आहे? शहाजहाँने सांगितलं होतं की उन्हाळा वाढला आहे माझं प्यायचं पाणी वाढवा, तेव्हा लुच्चा लफंगा औरंग्या काय म्हणतो? जिंदा रहना है तो रहो नही तो मर जाओ. जो स्वतःच्या बापाला असं म्हणतो आहे त्याच्याबाबत अबू आझमी असं कसं काय बोलतो? त्याची भलामण अबू आझमी कशी काय करतात? मी चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो की प्रस्तावात बदल करा.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान यासाठी कुठलंही आयुध लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान झाल्यास कुठल्याही आयुधाची मर्यादा बाळगू नये असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. १ लाख कवट्यांचा महाल बांधणारा तैमूरलंग नाही. तसंच छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा औरंग्या आणि त्याची भलामण करणारे अबू आझमी यांचं निलंबन दीर्घ काळासाठी करावं अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली. प्रस्ताव सभागृहात सादर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यासाठी आमदारांचा कौल घेतला. त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.