दिंडनेर्ली : सागर शिंदे
दिंडनेर्ली (ता.करवीर)येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात असलेले वॉटर एटीएम ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षिततेमुळे वापराविना धूळ खात पडून आहे.नाममात्र दरात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने जिल्हा परिषदेने उभा केलेले वॉटर एटीएम बंद पडले आहे.ग्रामपंचायतीला चालवायला जमेत नसेल तर भाडे तत्त्वावर चालविण्यास देऊन वॉटर एटीएम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे मार्फत नावीन्यपूर्ण योजनेतून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण सयंत्र (आर. ओ. सिस्टीम) बसविले होते. सुरुवातीला काही दिवस हे यंत्र सुरळीत चालले पण नंतर सारखा बिघाड होत राहिला.दोष दयित्वाचा कालावधी तीन वर्षाचा होता पण तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केल्याने जलशुद्धीकरण यंत्र पूर्णतः बंद पडले. हणबरवाडी येथील पाझर तलाव व दूधगंगा नदीतून गावाला पिण्याचे पाणी वापरले जाते.पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ होते तर तलावाच्या काठावरतीच एक वराह पालन सुरू असून त्याचे सांडपाणी तलावात मिसळते.त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी होते.अशा वेळी गावातील वॉटर एटीएम ग्रामस्थांना खूप मोलाचे ठरले असते.शासनाने निधी खर्च करून सुरू केलेले जलशुध्दीकरण सयंत्र बंद पडल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीला इकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर हे जल शुद्धीकरण यंत्र भाडे तत्त्वावर चालविण्यास द्यावे.जेणेकरून ग्रामस्थांना ही नाममात्र दरात शुद्ध पाणी उपलब्ध होईल, ग्रामपंचायतीस भाड्यातून थोडा का असेना महसूल मिळेल व एखाद्या तरुणास किंवा महिला बचत गटास उत्पन्नाचे साधन होईल.